रावेर(प्रतिनिधी):- रावेर शहरातील एका श्रीमंत व्यक्ती हनीट्रॅप मध्ये अडकवून संबंधा बाबत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या महिलेस एक लाख रुपये खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले याबाबत रावेर पोलीस ठाण्यात सदर इसमाने दिलेल्या फिर्यादीवरून या महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतचे वृत्त असे की रावेर तालुक्यातील एक इसम २०१८ मध्ये स्वतः च्या कार मध्ये जळगाव येथे जात असतांना प्रतिभा हिरालाल पाटील (वय ४३) रा . लोणी (ता. चोपडा) या महिलेने गाडीत लिफ्ट मागीतली. सोबत प्रवास केल्यामुळे त्यांची मैत्री वाढली. त्यामुळे तिने सदर इसमास जेवणास बोलवले. तिने कोल्ड्रीक्स मध्ये गुंगीचे औषध टाकुन त्यास बेशुद्ध करून त्याचे सोबत शारीरिक संबंध केले. यानंतर तिने त्याचे व्हिडिओ चित्रण करून सदर इसमाच्या घरी व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी सदर इसमास दिली. यामुळे सदर इसमाला भीतीपोटी वारंवार तिच्याकडे जावे लागत होते. यानंतर ती वारंवार खंडणी मागु लागली. २३ डिसेंबर २०२३ पासून सदर महिला व तिचा मुलगा निर्मल पाटील (वय २१) या दोघांच्या खात्यात फोन पे द्वारे सुमारे ११ लाख रुपये टाकले होते. यामुळे सदर महिलेची मागणी वाढत गेली .२१ फेब्रुवारी २०२५ रोजी सदर महिलेने फिर्यादीने ५ कोटी रुपये घेतल्याचा लेखी करारनामा पावती करून घेतला. या महिलेची पैशांची मागणी वाढत गेल्यामुळे सदर इसम त्रस्त झाला होता. त्याने रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना ही माहिती दिली. यावरून आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास जयस्वाल यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे, महिला पोलीस माधवी सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल महेश मोगरे ,सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण यांचे पथक पाठवून या महिलेवर कारवाईचे निर्देश दिले. तिला रंगे हात पकडण्यासाठी सापळा रचला. रावेर बऱ्हाणपूर मार्गावरील येथील एस एस बी टी मार्ट या दुकानाच्या मागील बाजूस सदर इसमास महिलेने एक लाख रुपये घेऊन बोलावले होते. यावेळी पोलिसांनी सदर पैसे स्वीकारताना त्या महिलेस रंगेहात पकडून तीला पोलीसांनी ताब्यात घेतले. याबाबत सदर इसमाने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.