अनंत चतुर्दशीच्या तयारीला सुरुवात असतानाच पुण्यात धक्कादायक गँगवॉरची घटना घडली आहे. नाना पेठ परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेत काही अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार केला. सलग तीन गोळ्या झाडल्यानंतर हा तरुण गंभीर जखमी झाला आणि उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिस तपासात मृत तरुणाची ओळख गोविंद कोमकर अशी पटली आहे.
गोविंद कोमकर हा एक वर्षापूर्वी झालेल्या नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या खुनामागे जुनी वैरभावना असल्याची शक्यता तपासली जात आहे.
अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला शहरभरात गणेश विसर्जनाची तयारी सुरु असताना अशा प्रकारचा खून झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासासाठी पथके नियुक्त केली आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
या खुनाच्या प्रकरणामागील नेमका हेतू काय, यामागे कोणते गट सक्रिय आहेत आणि हल्लेखोर कोण होते याचा तपास पोलीस जोरात सुरु आहे. घटनास्थळावरून काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून गुन्हे शाखेची विशेष टीम या तपासात गुंतली आहे.
पुण्यात अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला गँगवॉर; गोळीबारात तरुणाचा मृत्यू
10