Home लेटेस्ट न्यूज पुण्यात पुन्हा गोळीबार; वडगाव मावळमध्ये थरार, तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पुण्यात पुन्हा गोळीबार; वडगाव मावळमध्ये थरार, तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

by Arjun Mandwale
0 comments

अलीकडच्या काळात सतत घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नुकत्याच नाना पेठेत झालेल्या हत्येची धग अजून शमत नाही तोच वडगाव मावळ परिसरातून पुन्हा एक धक्कादायक गोळीबार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला फिर्यादी अक्षय मोहिते यांच्या चुलत भावाने घरी सोडलं होतं. यावरून संतापलेल्या आरोपींनी अक्षयच्या भावाला शाळेबाहेर स्कॉर्पिओ गाडीत बसवून मारहाण केली. त्यानंतर या प्रकरणावरून दोन्ही गटांमध्ये वाद वाढला.

संध्याकाळी साडेसहा वाजता अक्षय मोहिते मित्रांसह एकविरा चौकात बसलेले असताना आरोपी पुन्हा तेथे पोहोचले. यावेळी शिवीगाळ करत सौरभ वाघमारेने पिस्तूल काढून अक्षयवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न अपयशी ठरला, मात्र दुसऱ्यांदा फायर करताना सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही. अक्षय पळून जवळच्या सोसायटीत शिरल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला.

घटनेनंतर वडगाव मावळ पोलिसांनी तातडीने हालचाल करत छापे टाकले. या कारवाईत अभिषेक ओव्हाळ (28), रणजित ओव्हाळ (23) आणि प्रथमेश दिवे (23) यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सौरभ वाघमारे मात्र अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमधील भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. किरकोळ कारणावरून थेट गोळीबार होणे हा कायदा व सुव्यवस्थेवरील गंभीर प्रश्न मानला जात आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here