पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील गांधी चौका मध्ये गेल्या नऊ वर्षांपासून गणपती विसर्जनाच्या दिवशी एक वेगळी आणि मनाला भिडणारी परंपरा दौंड शहरात सुरू आहे. उ.बा.ठा शिवसेना गटाचे नेते गणेश दळवी आणि माजी नगरसेविका अनिता दळवी हे दांपत्य दरवर्षी “भुके को अन्न, प्यासे को पानी” या उदात्त ध्येयाने विसर्जनाला आलेल्या गणेश भक्तांना अन्नदान आणि पाण्याची व्यवस्था करतात.
शहरातील गणपती मंडळे, राजकीय, सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या सहकार्याने ही सेवा उपक्रम अधिकाधिक व्यापक होत चालली आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणारे हे अन्नदान थेट मध्यरात्रीपर्यंत, शेवटच्या गणपतीच्या विसर्जनापर्यंत सुरूच असते. दिवसभर चालणाऱ्या या सेवेमुळे हजारो भाविकांचा लाभ होत असून, गणपती विसर्जनाच्या वातावरणात श्रद्धा, भक्तीबरोबरच मानवसेवेचा सुवासही दरवळत असतो.
यामध्ये फक्त दळवी दांपत्यच नव्हे तर शहरातील अनेक राजकीय व सामाजिक संघटना एकत्रितपने त्याच्या कार्यात सहभाग नोंदवतात. समाजातील कोणत्याही वर्गाला न बघता प्रत्येक विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी पाणी आणि भोजन उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे या सेवेला आता “दौंडची गणेश विसर्जनातील परंपरा” अशी ओळख मिळाली आहे.
स्थानिक नागरिक व गणेश भक्तांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून, “गणेशोत्सवात दळवी दांपत्याचे अन्नदान म्हणजे भुकेल्यासाठी अन्न आणि तहानलेल्या भाविकांसाठी अमृत” असे मत व्यक्त केले.

