Home लेटेस्ट न्यूज प्रेमविवाहाचा सूड – केतन सुडगेची मध्यरात्री हत्या

प्रेमविवाहाचा सूड – केतन सुडगेची मध्यरात्री हत्या

by Arjun Mandwale
0 comments

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला  हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. भीमनगर परिसरात शनिवारी (ता.६) मध्यरात्रीच्या सुमारास काही युवकांनी केतन सुडगे या तरुणावर विटा-दगड व सिमेंटच्या चौकटीने भयंकर हल्ला चढवून त्याचा निर्दयीपणे खून केला. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केतन सुडगे याने एक वर्षापूर्वी दिक्षा सोनवणे हिच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र या विवाहाला मुलीच्या नातेवाईकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यातून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत गेला आणि अखेर या वादाचा शेवट रक्तरंजित हत्येत झाला.

शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास निखिल सुनिल चितारे, प्रेम तुषार जाधव, विवेक विनोद कांबळे आणि विक्रांत विनोद कांबळे (सर्व रा.भीमनगर) या चौघांनी केतनवर अचानक हल्ला चढवला. विटा, दगड आणि सिमेंटच्या चौकटीने तडाखे देत त्याला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात तो रस्त्यावर कोसळलेला असताना तातडीने त्याला दौंड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तो रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी केतनचा भाऊ अक्षय सुडगे यांनी दौंड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघा आरोपींवर भा. दं. सं. कलम 302 तसेच इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गेल्या काही दिवसांत दौंड शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here