Home राजकीय सांगोल्यात शिवसेनेच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोल्यात शिवसेनेच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

0 comments

सोलापूर मधील सांगोला येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित भव्य जाहीर सभेला सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते. शिंदे यांनी सोलापूरकरांना उद्देशून केलेल्या भाषणात जनतेशी असलेला आपुलकीचा नातेसंबंध अधोरेखित केला.

उपमुख्यमंत्री म्हणाले, “शहाजीबापू पाटील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी जनतेचे त्यांच्यावरचे प्रेम अद्याप टिकून आहे. मी शहाजीबापूंच्या पाठीशी ठाम उभा आहे आणि त्यांच्या मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो.” तसेच शहाजीबापूंनी सांगोला तालुक्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत, “त्यांच्या पाठपुराव्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी ८८३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच हा तालुका दुष्काळमुक्त होईल,” असे आश्वासन दिले.

“टायगर अभी जिंदा है… खरी लढाई आता सुरू झाली आहे,” असे उद्गार काढत उपमुख्यमंत्री यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यापुढे अधिक जोमाने पक्षवाढीसाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारून महायुती सरकार सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना, मुंबईतील इंदू मिल येथील स्मारक व लंडनमधील बाबासाहेबांच्या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर याबाबत माहिती दिली. या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी ५० लाखांचा अतिरिक्त निधी देण्यात येत असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.

याच सभेत डॉ. उमेश आलेगावकर यांचा शिवसेनेत औपचारिक प्रवेश झाला. या वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार शहाजीबापू पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे, दीपकआबा साळुंखे, शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे आणि आंबेडकरी चळवळीतील नेते तसेच हजारो शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही सभा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरली.

You may also like

Leave a Comment

Search Here