पुण्यातील चंदननगर परिसरात एक हृदयद्रावक घटना पुढे आली आहे. सॉफ्टवेअर अभियंता माधव साधुराव टिकेती (वय 38) याने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा, हिंमत टिकेती, चाकूने गळा चिरून खून केला. या कृत्यामागे पती-पत्नीमधील वारंवार होणारे वाद आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय हे कारण असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
घटनेनंतर माधव टिकेतीने मुलाच्या बेपत्ता असल्याची बनावट तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली. पण त्याच्या बोलण्यामध्ये तफावत असल्याचे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे तपास केला असता, माधव आपल्या मुलासोबत घराबाहेर जाताना आणि नंतर एकट्याने परतताना दिसला. या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून खूनासाठी वापरलेला चाकू, धारदार ब्लेड आणि मोबाइल फोन जप्त केला आहे. तसेच, गुन्ह्याच्या ठिकाणाहून जाऊन रक्ताचे आणि मातीचे नमुनेही गोळा करण्यात आले आहेत.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.