पुणे : ग्रामगौरव मीडिया फाउंडेशन आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने “ग्राममर्मी सन्मान सोहळा व ग्राम संवाद मेळावा” नुकताच श्री गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे उत्साहात पार पडला. ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
रेन वॉटर हार्वेस्टिंग व वेस्ट वॉटर हार्वेस्टिंग या अभिनव प्रयोगाच्या पॅटर्नला केंद्र शासनाने पेटंट म्हणून मान्यता दिल्याबद्दल “ग्राममर्मी महाराष्ट्र भूषण आमदार सन्मान” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अँड.राहुल दादा कुल यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान माजी कुलगुरू, ज्येष्ठ जलतज्ञ व कृषी शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव मगर यांच्या हस्ते प्रदान झाला. सन्मान स्वीकारल्यानंतर अँड.राहुल दादा कुल यांनी संयोजन समितीचे मनःपूर्वक आभार मानले.
पुणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये उल्लेखनीय काम , कार्य करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ‘आदर्श ग्राममर्मी’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
या प्रसंगी अँड. राहुल दादा कुल यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या ग्रामीण विकासाच्या विविध प्रकल्पांविषयी मनोगत व्यक्त करत माहिती दिली.
कार्यक्रमास मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ग्रामगौरव मीडिया फाउंडेशनचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे, तसेच जिल्ह्यातील अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.