Home लेटेस्ट न्यूज दौंड-पुणे शटलच्या डब्यात आगीची घटना; प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव वाचला

दौंड-पुणे शटलच्या डब्यात आगीची घटना; प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव वाचला

by Arjun Mandwale
0 comments

पुणे जिल्ह्यातील दौंड जंक्शन स्टेशन  मधून सकाळी दौंडहून पुण्याकडे जाणाऱ्या शटल ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली. दौंड जंक्शनहून ७:०५ वाजता सुटलेल्या शटलच्या तिसऱ्या डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली.

प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीची माहिती मिळताच डब्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी तातडीने टॉयलेटकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, आग लागलेल्या टॉयलेटमध्ये एक प्रवासी अडकला होता. दरवाजा आतून लॉक असल्याने तो बाहेर पडू शकत नव्हता. टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागल्याने आत अडकलेल्या प्रवाशाने आरडाओरड सुरू केली.

प्रवाशांनी धाडस दाखवत दरवाजा तोडून त्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. घटनेची माहिती तात्काळ स्टेशन मास्तर व रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे लागणारी आग ही गंभीर बाब असून, अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने डब्यांची तातडीने तपासणी करावी, अशी प्रवाशांकडून मागणी करण्यात येत आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here