पुण्यातील कॅम्प परिसरात घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. साचापीर स्ट्रीट येथील जुन्या ओयसिस हॉटेलच्या शेजारील इमारत क्रमांक ४९५/४९६ येथे सुरु असलेल्या बांधकामाचे स्लॅब कोसळून एक तरुण कामगार जागीच ठार झाला, तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्लॅब टाकण्याचे काम सुरू असतानाच स्लॅबचा एक भाग अचानक कोसळला. ही दुर्घटना सुरक्षेच्या उपाययोजना न घेतल्याने घडली असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि कामगार हक्क कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
दुर्घटनेत मृत पावलेल्या युवकाचे नाव अद्याप समोर आले नसून, जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, दुर्घटनेस जबाबदार असलेल्या बिल्डर राणावत-मेहता तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे, याच बांधकामस्थळी काही महिन्यांपूर्वीही एका कामगाराचा मृत्यू झाला होता. मात्र ती घटना दबवण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेश जाधव व दिनेश परदेशी यांनी केला आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष अतिश कुऱ्हाडे आणि शाखा अध्यक्ष उमेश कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी स्वतः संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पाटील साहेब आणि साबळे साहेब यांना याची माहिती दिली. बांधकाम सुरू करताना कोणतीही सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.