पुणे शहरातील कोंढवा परिसरातील एका नामांकित आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गृहनिर्माण संकुलात बुधवारी रात्री घडलेल्या एका संतापजनक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचे भासवत एका २५ वर्षीय युवतीच्या घरी प्रवेश करून तिच्यावर जबरदस्ती केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेसातच्या सुमारास आरोपीने पीडितेच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावून “कुरिअर आहे” असे सांगितले. पीडित महिलेने कुरिअर स्वीकारण्यास नकार दिला असतानाही, “सही करावी लागेल” असा आग्रह करत महिलेला सेफ्टी डोअर उघडायला भाग पाडले. दरवाजा उघडताच आरोपीने तिच्या तोंडावर केमिकलयुक्त स्प्रे फवारला, ज्यामुळे पीडिता काही वेळातच बेशुद्ध झाली.
यानंतर आरोपीने तिच्यावर गंभीर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईलचा वापर करत स्वतःचा सेल्फी काढला आणि ‘मी पुन्हा येईन’ असा मजकूर टाईप करून ठेवला. हा प्रकार पीडितेच्या मानसिकतेवर खोल आघात करणारा ठरला आहे.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह:
ही घटना विशेष म्हणजे सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक आणि प्रवेशनियंत्रण यंत्रणा असलेल्या उंचभ्रू सोसायटीत घडली आहे. आरोपीने कोणतीही ओळखपत्रे न दाखवता “कुरिअर डिलिव्हरी”च्या बहाण्याने सोसायटीत प्रवेश केल्याचे उघड झाले असून, सुरक्षारक्षकांकडून पुरेशी तपासणी न झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोंढवा पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, आरोपीचा माग काढण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषणासह विविध अंगांनी तपास सुरू आहे.
या संदर्भात कुठलीही माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांनी केले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने आदर्श मानल्या जाणाऱ्या सोसायटीत अशी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सुरक्षिततेच्या यंत्रणांवर कठोर पुनरावलोकनाची गरज निर्माण झाली आहे.
कोंढव्यात धक्कादायक घटना: कुरिअर बॉयच्या नावाखाली घरात घुसून २५ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार
5