बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात नानासाहेब चौरे या व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, चौरे हा मस्साजोग येथील सरपंच हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडचा समर्थक असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी ही मानसिकदृष्ट्या दुर्बल असून ती केज पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावात राहते. आरोपी नानासाहेब चौरे याने तिच्यावर बळजबरी केली. ही घटना घडत असताना पीडितेच्या नात्यातील एका महिलेला ही बाब लक्षात आली. तिने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने दोघींनाही जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेनंतर संबंधित महिलेने पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी केज पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या आधारावर पोलिसांनी बलात्कार आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली नानासाहेब चौरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.
नानासाहेब चौरे याने यापूर्वीही वाल्मीक कराडच्या सुटकेसाठी आंदोलन करत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. त्यामुळे या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरु असून पुढील तपास सुरू आहे.
मतिमंद मुलीवर बलात्कार; वाल्मीक कराडच्या समर्थकावर गुन्हा दाखल
3