गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लसीमुळे अचानक होणाऱ्या मृत्यूची चर्चा समाजमाध्यमांवर जोरात सुरू होती. अनेक व्हिडीओ, बातम्या आणि अफवांमुळे जनमानसात भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, यावर आता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने अधिकृतरित्या स्पष्टता दिली आहे की, कोरोना लस आणि अचानक होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये कोणताही वैज्ञानिक संबंध नाही.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) आणि AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) यांच्या सहकार्याने दोन स्वतंत्र अभ्यास करण्यात आले. या अभ्यासात १८ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांचा शोध घेण्यात आला.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासामध्ये कोरोना लसीचा आणि अचानक मृत्यूंचा कोणताही थेट संबंध आढळून आला नाही. उलट, अचानक होणाऱ्या मृत्यूंमागे अनुवंशशास्त्रीय कारणं, जीवनशैलीतील बदल, पूर्वीपासून असलेल्या वैद्यकीय स्थिती आणि कोरोना संसर्गानंतरच्या गुंतागुंती यांचा मोठा वाटा आहे.
मे ते ऑगस्ट २०२३ दरम्यान ICMR ने १९ राज्यांतील ४७ रुग्णालयांमध्ये अभ्यास केला, ज्यात ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीतील रुग्णांचा समावेश होता. दुसरा अभ्यास अद्याप AIIMS आणि ICMR करत असून, त्यामध्येही हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आणि मायोकार्डियल इन्फेक्शन यासारख्या कारणांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाचे निष्कर्ष असे आहे की,
भारतातील कोरोना लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत.गंभीर दुष्परिणामांची शक्यता अत्यल्प आहे.अचानक मृत्यू आणि कोरोना लसी यांचा थेट संबंध आढळलेला नाही.
मृत्यूमागे अनुवंश, जीवनशैली, जुने आजार आणि कोविडनंतरच्या गुंतागुंती प्रमुख कारणं आहे.
सरकारचा संदेश स्पष्ट आहे की कोरोना लसीबाबत कोणतीही चुकीची माहिती अथवा भीती पसरवू नका. नागरिकांनी विश्वास ठेवावा आणि अशा अफवांपासून सावध रहावे.
कोरोना लस आणि अचानक मृत्यू यामध्ये कोणताही संबंध नाही – आरोग्य मंत्रालयाचा स्पष्ट खुलासा
1