पुणे जिल्ह्यातील यवत (ता. दौंड) येथे शुक्रवारी दुपारी अचानक उसळलेल्या हिंसाचारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. एका व्हॉट्सअॅप स्टेट्समुळे निर्माण झालेल्या या वादानंतर मोठा जमाव आक्रमक झाला व दुकानांवर, घरांवर दगडफेक आणि काही ठिकाणी जाळपोळ झाली. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
“संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली आहे “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले की,यवतसारख्या शांत शहरात कधीच अशा प्रकारची घटना घडली नव्हती. सध्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, SRPF पथक याठिकाणी कार्यरत असून पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे. परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.”
पवारांनी माहिती दिली की, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात मध्यप्रदेशातील एका घटनेतील व्हॉट्सअॅप स्टेट्समधून झाली. संबंधित व्यक्ती नांदेडवरून येऊन यवत परिसरात बिगारी काम करत होता. त्याने केलेल्या पोस्टमुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आणि ही अप्रिय घटना घडली. मात्र, या व्यक्तीचा स्थानिकांशी कोणताही थेट संबंध नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत कलम 144 लागू केले असून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी संयम राखावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी समतेचा आणि शांततेचा संदेश दिला
“शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. अशा राज्यात एकोप्याचं वातावरण टिकवणं आपली जबाबदारी आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करा,” असं आवाहनही त्यांनी केलं