पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौंड येथील जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष व सेवानिवृत्त जलसंपदा अभियंता रविंद्र जाधव यांनी थेट खुले पत्र लिहून दौंड तालुक्यातील विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
दि. १ ऑगस्ट रोजी माजी आमदार रमेश थोरात यांच्या महायुतीत प्रवेशाच्या निमित्ताने लिहिलेल्या या पत्रात, जाधव यांनी गेली ३५ वर्षे दौंडमध्ये केवळ ‘कुल-थोरात’ कुटुंबांचेच राजकारण फिरत राहिल्याचे सांगितले. मात्र, या काळात दौंड शहर व तालुक्याचा समांतर विकास झाला नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली.
खुल्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे:
शिक्षणाचा अभाव: तालुक्यात दर्जेदार शाळा आणि महाविद्यालयांचा अभाव आहे. पालकांना मुलांचे शिक्षण पुणे वा बारामतीला हलवावे लागते.
आरोग्य व्यवस्था ठप्प: उपजिल्हा रुग्णालयाचे काम रखडले आहे. वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न: शहरात महिला स्वच्छतागृह नाही. वाढती गुन्हेगारी, चोऱ्या, दमदाटी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नगरपालिकेची अस्थिरता: दोन वर्षांत ५ मुख्याधिकारी बदलले. रस्ते, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा कोलमडल्या आहेत.
अवैध धंदे आणि पोलीस हस्तक्षेप: गुन्हेगारीला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप. पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र.
महामार्गांचे अर्धवट काम: अष्टविनायक मार्ग, पुणे-सोलापूर सेवा रस्ते व रोड क्रॉसिंग अद्याप अपूर्ण. नागरिक त्रस्त.
महावितरणची बेजबाबदार कार्यपद्धती: नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांना वारंवार अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पाणीप्रश्न आणि प्रदूषण: नदी प्रदूषण, शेतीचे नुकसान, कुरकुंभ एमआयडीसीतील प्रदूषण आणि गुंडगिरी यामुळे पर्यावरण व आरोग्यावर परिणाम.
रविंद्र जाधव यांची मागणी अशी आहे की,
“आता आजी-माजी आमदार आपल्या पक्षात असल्यामुळे महायुती मजबूत झाली आहे. त्यामुळे दौंडकरांवरील राग बाजूला ठेवून शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जातीने लक्ष द्यावे. आमदारांना आर्थिक व प्रशासकीय ताकद देऊन रखडलेली कामे मार्गी लावावीत,” अशी स्पष्ट आणि ठाम मागणी रविंद्र जाधव यांनी पत्रातून केली आहे
“दौंडचा विकास थांबलेला का?” — आम आदमी पार्टीचे रविंद्र जाधव यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुले पत्र
27