पुणे जिल्ह्याच्या दौंड मतदारसंघातील राजकीय वर्तुळात आज खळबळ माजवणारी घडामोड घडली आहे. माजी आमदार रमेश अप्पा थोरात यांनी पुन्हा एकदा गटांतर करत अजित पवार यांच्या नेत्यत्त्वाखालील ‘घड्याळ’ पक्षात प्रवेश केला आहे.
एकेकाळी अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे थोरात, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या गटात सामील झाले होते. त्यांनी तुतारी चिन्हावर निवडणूकही लढवली, परंतु पराभव त्यांच्या वाट्याला आला.
निवडणुकीत आलेल्या पराभवानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ गटाकडे पाठ वळवत अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे.
वरवंड येथील नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात थोरातांनी अधिकृतरीत्या अजित पवार गटात पुनर्प्रवेश केला.
या वेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या जयघोषात थोरातांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “मी दौंडच्या विकासासाठी पुन्हा एकदा घड्याळ हाती घेतलं आहे. लोकांच्या हितासाठी हे पाऊल उचललं आहे.”
या प्रवेशामुळे दौंड तालुक्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. स्थानिक राजकारणात आपली पकड कायम ठेवणारे रमेश थोरात यांचा गटबदल हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शरद पवारांच्या गटात प्रवेश करताना थोरातांनी सार्वजनिक माफी मागितली होती, आणि “मी साहेबांच्या निर्णयाला मान देतो,” असेही म्हटले होते. मात्र, काही महिन्यांतच परिस्थिती बदलली आणि आता पुन्हा ते त्यांच्या आधीच्या वाटेवर परतले आहेत.
राजकीय विश्लेषण चे असे भी म्हणणे आहे की दौंडसारख्या मतदारसंघात नेतृत्व व पक्षनिष्ठा यांच्यातील संघर्ष कायम राहणार, हे यातून स्पष्ट होत आहे.
रमेशअप्पा थोरातांच्या या राजकीय उलथापालथींमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारचा गोंधळ, मनस्ताप आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.
काही कार्यकर्त्यांनी आंतरिक गटचर्चांमध्ये व्यक्त केले की, “आम्ही निष्ठेने त्यांच्यासोबत राहिलो, पण आता हे नेतृत्वच दिशा बदलत असेल, तर कार्यकर्त्यांचे काय?” असे प्रश्न उपस्थित होत आहे.
थोरातांच्या पुनर्प्रवेशामुळे अजित पवारांच्या संघटनेला दौंडमध्ये नवा जोर मिळेल, अशी प्रतिक्रिया पण दिली जात आहे.
“राजकारणात काहीही अंतिम नसतं” हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. रमेश थोरातांचा प्रवास हा केवळ गटबदल नाही, तर दौंडमधील सत्तासमीकरणांचे नवे भाकित ठरू शकतो.
“नेतृत्व बदलतं, पण निष्ठा अडकते – रमेश थोरातांचा पुनः ‘घड्याळ’ प्रवास आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”
27