दौंडला प्रति पंढरपूर म्हणून ओळख आहे. त्यामुळे आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनाला येतात.
पंचक्रोशीतील कुरकुंभची फिरंगाई माता, पांढरेवाडी, कौठडी, मेरगळवाडी, गिरीम, जिरेगाव, मळद येथील ग्रामदैवत भैरवनाथ तर माळवाडी व मसनरवाडीचे ग्रामदैवत म्हसोबा, भोळोबावाडीचा भोळोबा तसेच येडेवाडी व शिरसूफळ येथील ग्रामदैवतांच्या पालख्या ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाच्या उधळणीसह दौंड शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाल्या.
शहराच्या परंपरेनुसार पालख्यांचे स्वागत गावचे पाटील म्हणून माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, मल्हार जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध राजकीय पक्षांनी पण पालख्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले, येणाऱ्या भक्तांसाठी फराळाची ,पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी शहरातील प्रमुख चौकांमध्ये विविध सामाजिक संस्था, दलित संघटना, शिवस्मारक समिती तसेच “दौंड मंडप-डेकोरेशन-साऊंड संघटना” यांच्यावतीने पालखीतील भक्तांसाठी खिचडी व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. दौंड नगर परिषदेने देखील स्वागतासाठी विशेष व्यवस्था केली होती.
दौंड शहराच्या परिसरातील 14 गावांच्या ग्रामदैवतांच्या पालख्या व दौंडचे ग्रामदैवत भैरवनाथ यांच्या पालखीने हरिनामाचा जयघोष करत विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. यावेळी पारंपरिक वाद्य आणि विठ्ठलनामाच्या घोषाने संपूर्ण दौंड नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
दौंड नगरीत ग्रामदेवतांच्या पालख्या हरिनामाच्या गजरात दाखल; शहरात स्वागताचा उत्सव
22