जे. जे. हॉस्पिटलमधील ३२ वर्षीय डॉक्टरने अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. सोमवारी (दि. ७ जुलै) रात्री ९:४३ वाजता मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील ११.८०० किमी बिंदूवर ही घटना घडली.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टराची ओळख डॉ. ओंकार भागवत कवितके (वय ३२, रा. अविनाश सोसायटी, कळंबोली) अशी झाली आहे. ते जे. जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. अटल सेतूवरील नियंत्रण कक्षाला एक व्यक्ती उडी मारताना दिसल्यानंतर लगेचच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस आणि बीट मार्शल काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.
तेथे त्यांना एक होंडा अमेझ कार (MH 46 CM 6837) आणि एक iPhone आढळून आला. मोबाईलवरील संपर्कांद्वारे संबंधित डॉक्टराची ओळख पटवण्यात आली. यानंतर डॉ. कवितके यांची बहीण कोमल प्रमोद लंबाते यांनी नातेवाइकांसह कळंबोली पोलिस ठाण्यात उपस्थिती लावली आहे.
सध्या डॉ. कवितके यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी सागरी सुरक्षा विभागाची ‘ध्रुवतारा’ बोट, बचाव पथक व ॲम्ब्युलन्सच्या मदतीने खाडीत व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अटल सेतूसारख्या अत्यंत महत्वाच्या मार्गावर अशी घटना घडल्याने सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अटल सेतूवरून जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; शोधमोहीम सुरु
19