मुंबईच्या सांताक्रूज (पूर्व) वाकोला परिसरात एका चार्टर्ड अकाउंटंटने ब्लॅकमेलिंग आणि खंडणीला कंटाळून आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. राज मोरे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या सीएचे नाव असून, फेसबुकवरून सुरू झालेल्या संबंधांचे रूपांतर शारीरिक संबंधांत झाल्यानंतर, त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ३ कोटी रुपये उकळण्यात आले होते.
राज मोरे यांनी शनिवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी ३ पानी सुसाइड नोट लिहून आपल्यावर मानसिक छळ करणाऱ्या सना कुरेशी आणि राहुल परवानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
फेसबुकवरून सुरु, मृत्यूपर्यंत पोहोचलेलं नातं
दोन वर्षांपूर्वी राज मोरे यांची ओळख सना कुरेशी या तरुणीसोबत फेसबुकवर झाली होती. मैत्रीतून सुरुवातीला प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यानंतर शारीरिक संबंध. याच काळात सना कुरेशीचा मित्र राहुल परवानी याने दोघांचे खाजगी क्षणांचे व्हिडिओ शूट करून ठेवले.
यानंतर या व्हिडिओंचा वापर करत दोघांनी राज मोरे यांना सातत्याने धमकावले आणि १८ महिन्यांत ३ कोटी रुपये उकळले. पैशांची मागणी थांबत नसल्यामुळे वैतागलेल्या राज मोरे यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करला.
आईसमोर मारहाण व अपमान, शेवटचा टप्पा ठरला
आत्महत्येपूर्वी काही दिवस आधी आरोपी सना आणि राहुल राज यांच्या घरी गेले. त्यांच्या आईसमोरच शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी देखील दोघांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या सततच्या मानसिक छळामुळे राज मोरे पूर्णपणे खचले होते.
पोलीस तपास सुरु, आरोपींचा शोध सुरू
राज मोरे यांची सुसाइड नोट वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यामध्ये दोघांचा तपशीलवार उल्लेख आहे. पोलिसांनी सना कुरेशी व राहुल परवानी यांच्याविरोधात खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि आत्महत्या प्रवृत्त करणे या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे वाकोला परिसरासह मुंबईत खळबळ उडाली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत.
सांताक्रुजमध्ये सीएचा आत्महत्या प्रकरण : ब्लॅकमेलिंग, खंडणीमुळे ३२ वर्षीय तरुणाचा अंत; सुसाइड नोटमधून उघड झाला सर्व प्रकार
20