कधी शांततेसाठी ओळखले जाणारे पुणे शहर आता गुन्हेगारीच्या सावटाखाली सापडले आहे. शहरात गुन्हेगारीने अक्षरशः उग्ररूप धारण केलं असून, रस्त्यावर गुंडांनी थैमान घातलंय. वाहनांची जाळपोळ, मारामाऱ्या आणि आता थेट गोळीबार – हे सर्व प्रकार शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
गाडीचा कट मारल्याच्या रागातून थेट हवेत गोळीबार!
गेल्या २४ तासांत घडलेल्या दोन गोळीबाराच्या घटनांनी पुणेकरांना हादरवून सोडलं आहे. पहिली घटना घडली ती कोल्हेवाडी परिसरात, जिथं एकाने दुचाकीवरून जाताना कट मारल्याच्या कारणावरून संतापून थेट देशी बनावटीच्या पिस्तूलातून हवेत गोळीबार केला.
घटना घडली तेव्हा परिसरात दुपारची वेळ होती आणि नागरिकांनी गोंधळून पोलिसांना माहिती दिली. नांदेड सिटी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एक आरोपी ताब्यात घेतला असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
दुसरी धक्कादायक घटना घडली ती उत्तमनगर भागात, जिथं पाच तरुण एकत्र बसून मोबाइलवर ‘पबजी’ गेम खेळत होते. यावेळी यातील एका तरुणाने आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी त्याच्याकडे असलेलं पिस्तूल बाहेर काढलं. लोड-अनलोड करताना चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी समोर उभ्या असलेल्या मित्राच्या पायात घुसली.
या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिस्तूल जप्त केलं असून तपास सुरू आहे.
पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.पुणे शहरात दिवसाढवळ्या अशा गोळीबाराच्या घटना होणे हे चिंताजनक आहे. केवळ क्षुल्लक कारणांवरून थेट पिस्तूल काढून हवेत गोळीबार करणे किंवा गेम खेळताना अस्त्रास्त्र हाताळण्याची सवय लागणे हे शहरातील तरुणवर्गाच्या मानसिकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतं.
पुण्यात कायदा सुव्यवस्थेचं आव्हान निर्माण !
पुण्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्ह्यांवर पोलिस यंत्रणेला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. पिस्तूल आणि इतर शस्त्रांची सहज उपलब्धता, सोशल मीडियावर गुंडगिरीचे प्रमोशन आणि गँग कल्चर वाढत असल्याचे चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे.
नागरिकांचे प्रशासनाला आवाहन पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची गरज आहे. गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई न केल्यास ही स्थिती आणखी गंभीर व बेकाबू होण्याची शक्यता आहे.
पुणे हादरलं! अवघ्या २४ तासात दोन गोळीबाराच्या घटना, गुन्हेगारी वाढतेय की काय?
30