पुणे शहर पुन्हा एकदा गँगवॉरच्या सावटाखाली आले आहे. झेड ब्रिज परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास जुन्या वादातून एका तरुणावर पाच ते सहा जणांनी मिळून कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, झेड ब्रिज परिसरात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात ठेवून हल्लेखोरांनी आज संधी साधत संबंधित व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार केले. हल्लेखोरांचा रोष इतका होता की त्यांनी परिसरातील दोन गाड्यांचीही तोडफोड केली .
हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. रुग्णालय प्रशासनाने त्याच्या प्रकृतीवर काहीही बोलणे टाळले आहे. मात्र डॉक्टर सतत निगराणी ठेवून उपचार करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, हा हल्ला पूर्वीच्या वादातून झाला असावा. मात्र, इतर कोणत्या गटांचा यात सहभाग आहे का याचा तपासही सुरू आहे.
नागरिकांमध्ये वाढते अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गँगवॉर, रस्त्यावरील हल्ले, कोयता गँग यासारख्या घटना वाढल्या आहेत. या प्रकारांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शहराची प्रतिमा धुळीस जात असून,कायदा-सुव्यवस्था बिघडत चालल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.
पोलिसांकडून कठोर कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत.
विश्रामबाग पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी या घटनेचा गांभीर्याने तपास घेत असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गटांचा बंदोबस्त केला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
