मुंबई ते नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचे कार्य सुरु आहे आणि त्यामुळे या घाटात दोन टप्प्यांवर ट्रॅफिक ब्लॉक करण्यात येत आहे. हे ट्रॅफिक ब्लॉक तब्बल सहा दिवस ठेवण्यात येणार असल्याचे निर्देश घोषित करण्यात आले आहे. हा ब्लॉक घाटाच्या दुरुस्तीसाठी तसेच पावसाळ्यापूर्वीची तयारी करण्यासाठी नियोजित करण्यात आला आहे. प्रवाशांनी या गोष्टीची दखल घेणे आवश्यक आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट सहा दिवस दोन टप्प्यांवर बंद राहणार आहे त्यामुळे तिथे
सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या कालावधीत ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात येत आहे. यावेळी हा ट्रॅफिक ब्लॉक तेथील दुरुस्तीच्या कामासाठी ठेवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे या घाटावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही दिवस त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यावेळी या बातमीची दखल या प्रवाशांनी घेणे अत्यंत आवश्यक ठरते.
ट्रॅफिक ब्लॉकचा निश्चित कालावधी:
हा ब्लॉक संपूर्ण सहा दिवसांचा नसून त्यात थोडे अंतर ठेवण्यात आले आहे जेणेकरून प्रवाशांना जास्त त्रासाला सामोरे जावे लागू नये. २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२५ तसेच ३ मार्च ते ६ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या कालावधीत या ठिकाणी ट्रॅफिक ब्लॉक करण्यात येण्याचे घोषिक केले आहे. जुन्या कसारा घाटाची दुरुस्ती तसेच मॉन्सूनची पूर्वतयारी म्हणून कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहने नाशिक – मुंबई लेनवरील नव्या कसारा घाटाकडे वळवण्यात येणार आहे.
ट्रॅफिक ब्लॉकचे नियोजन कसे असेल?
वरील नमूद सहा दिवसात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता उद्भवत असून या दिवसात अवजड वाहनांना संपूर्णतः बंदी असल्याचे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. ट्रक, बसेस, ओसीडी यासारखी अवजड वाहने मुंबई – पुणे एक्सप्रेस वे मार्गे वळवली जाणार आहेत.
या घाटाच्या दुरुस्ती दरम्यान वाहतूक मुंबई नाशिक हायवेच्या नव्या कसारा घाटाकडे वळवणार असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवता येते, तसेच तिथे दुरुस्तीचे काम सुरु असल्या कारणाने दरड कोसळणे, अपघात होणे किंवा घाटातून वाहने खाली जाणे यासारख्या भयंकर अपघातांची संभावना वर्तवता येते. यावेळी त्या दुरुस्तीच्या ठिकाणी तसेच जिथे वाहतूक वळवली जाणार आहे त्या ठिकाणी पोलिस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र,
महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, वाहतूक पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन संघ कार्यरत असणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र उभारली जाणार आहेत. परंतु प्रवाशांनी देखील ही बाब लक्षात घेऊन सावकाश व लक्षपूर्वक प्रवास करणे अत्यंत महत्वाचे आहे.
या दुरुस्तीच्या कार्यामध्ये घाटातील जुनी आणि प्रचंड वाढलेली झाडे जी पावसाळ्यात पडण्याची शक्यता वर्तवता येते ते हटवण्यात येत आहेत, तर वाहतुकीस घातक ठरणाऱ्या डोकावणाऱ्या दरडी देखील काढण्यात येणार आहेत. सहा दिवस प्रवाशांना त्रास होईल, परंतु या दुरुस्तीमुळे पावसाळ्यात होणारे अपघात टळतील आणि प्रवास सुखकर होईल.