महाशिवरात्री निमित्त भक्तगण भगवान शंकराची आराधना करण्यासाठी देवाच्या पावन ठिकाणी जाणे पसंत करतात, यावेळी पुण्यातील निळकंठेश्वर, बनेश्वर तसेच शंकरवाडी येथील घोरावाडेश्वर मंदिर पायथा येथे भाविकांची गर्दी जमते, त्यामुळे बुधवार, दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी भाविकांच्या सेवेसाठी पुणे महानगर परिवहन मंडळातर्फे कात्रज, स्वारगेट आणि निगडी या महत्वाच्या बस स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर बस सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
महाशिवरात्री हा अत्यंत मोठा उत्सव आहे. यावेळी भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची आराधना करतात. परंतु बसेसची कमतरता असल्याने भाविकांना बसमध्ये भरगच्च गर्दी अनुभवावी लागते तर कधी बराच वेळ बस स्थानकावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते. याप्रकारे भाविकांची गैरसोय होते. किंवा काही भाविक गर्दी किंवा विलंब टाळण्यासाठी आपली स्वतःची गाडी काढून इच्छित स्थळी जाणे पसंत करतात. परंतु यामुळे अशा सणांनिमित नेहमी वाहतूक कोंडी अनुभवावी लागते. यामुळे पुणे महानगर परिवहन मंडळाने एक अत्यंत सुलभ उपक्रम योजिला आहे. भाविकांना महादेवाचे दर्शन करण्याची सोय व्हावी यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाने भाविकांना सोयीस्कर असा निर्णय घेतला आहे. बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची निळकंठेश्वर, बनेश्वर तसेच शंकरवाडी येथील घोरावाडेश्वर मंदिर पायथा अशा पावन ठिकाणी एकच गर्दी जमते तसेच प्रवासादरम्यात रस्त्यावरील ट्रॅफिक देखील वाढते. या ट्रॅफिकमुळे अन्य नागरिकांना देखील त्याचा त्रास होतो व वाहतूक खोळंबल्याने अनेक परिणामांना सामोरे जावे लागते. यामुळे भाविक त्यांच्या इच्छुक स्थळी कोणत्याही अडचणींशिवाय पोहोचावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मंदिरात आणि रस्त्यावर होणारी गर्दी टाळणे सोपे जाऊ शकते.
शहर व उपनगरातून हजारो भाविक दर्शनासाठी शंकराच्या मंदिरात जात असतात, त्यामुळे पुण्यातील कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर ( चेलाडी फाट्यापर्यंत ), स्वारगेट ते निळकंठेश्वर तसेच निगडी ते घोरावाडेश्वर मंदिर पायथा ( शंकरवाडी ) या ठिकाणावरून पीएमपीच्या बसेस मोठ्या प्रमाणात धावणार आहेत. यावेळी भाविकांनी स्वतःची वाहने न वापरता पीएमपीद्वारे जादा सोडल्या जाणाऱ्या बसेसचा वापर करावा अशी अपेक्षा आहे. यामुळे ट्रॅफिक नियंत्रणात राहण्याची शक्यता वर्तवता येते. जास्तीत जास्त भाविकांनी या पीएमपी बसेसचा लाभ घ्यावा असे पुणे महानगर परिवहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
कात्रजवरून बनेश्वरला जाण्यासाठी पहिली बस पहाटे ५.३० वाजता सुटणार आहे. कात्रज ते सारोळामार्गे कापूरहोळ, कात्रज सर्पोद्यान ते वेल्हे आणि कात्रज सर्पोद्यान ते वांगणीवाडी या मार्गावर नऊ बसेस आणि महाशिवरात्रीनिमित्त दोन जादा बसेस अशा एकूण ११ बसेस या दिवशी बनेश्वरला जाणार आहेत. तसेच स्वारगेट मेन स्टॉपवरून निळकंठेश्वर इथे जाण्याकरता पहिली फेरी पहाटे ३.३० वाजता असून या दिनानिमित्त १२ ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. म्हणजेच एकूण १४ बसेस या मार्गावरून त्यादिवशी सोडण्यात येणार आहेत. निगडी येथून शंकरवाडी येथे जाण्यासाठी महाशिवरात्रीनिमित्त पहिली फेरी ५.२० वाजता सुटणार आहे. आणि या पावन दिवसानिमित्त एकूण २२ बसेस धावणार असल्याची माहिती मिळत आहे.
प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भाविकांनी स्वतःची गाडी न काढता पीएमपीच्या बसेसचा वापर करावा आणि प्रदूषण टाळण्यासाठी हातभार लावावा. पुणे महानगर परिवहन मंडळातर्फे हा एक अत्यंत उत्तम उपक्रम राबवण्यात येत आहे आणि या उपक्रमाचा लाभ शिवरात्रीप्रसंगी सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन पुणे परिवहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.