१७ मार्च २०२५ रोजी नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या मुख्य आरोपी फहीम शमीम खानच्या घरावर नागपूर महानगरपालिकेने २४ मार्च रोजी बुलडोजर कारवाई केली.महानगरपालिकेने फहीम खानला अवैध बांधकाम हटवण्यासाठी २४ तासांची नोटीस दिली होती, नोटीस काळ संपल्यानंतर ,संजय बाग कॉलनी, यशोधरा नगर येथे स्थित या दोन मजली घराच्या अनधिकृत बांधकामाचा भाग पाडण्यात आला. फहीम खान, जो माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष आहे, त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे भडकाऊ पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करून लोकांना हिंसेस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याला १९ मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसेत सामील असलेल्या आरोपींच्या संपत्तीवर बुलडोजर कारवाई करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर, नागपूर महानगरपालिकेने फहीम खानच्या घराच्या अनधिकृत भागावर ही कारवाई केली. महाराष्ट्रात दंगेखोरांच्या विरोधात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई मानली जात आहे.
फहीम खानने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्याला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.या कारवाईमुळे नागपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या पालनासंदर्भात प्रशासनाची कठोर भूमिका स्पष्ट झाली आहे.