मुक्ताईनगर प्रतिनिधी :-
महावितरण विभागामध्ये मुख्य कार्यालयाने विविध कामांमध्ये विभागानुसार निविदा काढलेल्या असून जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर सह इतरत्र काही ठेकेदारांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र, दस्तावेज निविदा प्रक्रियेत जोडले असून सर्व ठेकेदारांनी निविदांमध्ये जोडलेल्या सर्व अनुभव प्रमाणपत्र,दस्तावेजांची सखोल चौकशी होऊन त्यांना पात्र)अपात्र करण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी अधीक्षक अभियंता,जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महावितरण विभागामध्ये NSC,LT,HT BREKDOWN,DTC अशा अनेक निविदांमध्ये जिल्ह्यात काही ठेकेदारांनी संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी आर्थिक हितसंबंध साधून बनावट अनुभव प्रमाणपत्र तसेच दस्तावेजाच्या आधारावर निविदा प्रक्रियेत पात्र होण्यासाठी धडपड सुरू असल्याची चर्चा महावितरण विभागांमध्ये आहे. व त्याचा सबळ पुरावा म्हणजे भुसावळ विभागात मागील वर्षीच्या निविदांमध्ये अनुभव प्रमाणपत्रांमध्ये एडिटिंग करून बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारावर एक ठेकेदार पात्र झाला होता तो हाच संबंधित ठेकेदार जिल्ह्यातील इतर विभागांमध्ये अपात्र झाला होता. विशेष खेदाची बाब म्हणजे महावितरण विभागाने काढलेल्या निविदांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यात एकच अटी शर्ती नियम असताना काही ठेकेदार त्याच निविदेमध्ये इतर विभागात अपात्र होतात व काही विभागात पात्र होतात त्यामुळे संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता व सदर ठेकेदार यांची आर्थिक भागीदारी सिद्ध होते. व या महावितरणच्या भ्रष्ट कारभारावर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वारंवार पुरावे सादर करूनही मुंग गिळून गप्प असतात. याचाच अर्थ संबंधित ठेकेदार हा परिमंडळ, मंडळ कार्यालयातील अधिकाऱ्यांसह मुख्य तपास अधिकाऱ्यांना सुद्धा आर्थिक मॅनेज करतो या चर्चेवर एक प्रकारे शिक्कामोर्तब होत आहे, कारण अशा बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारावर निविदा प्रक्रियेत पात्र झालेल्या ठेकेदारांवर पुरावे सादर करून सुद्धा महावितरण चे मुख्य तपास अधिकारी, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता कार्यवाही करण्यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहेत देवच जाणो.
त्यामुळे भुसावळ विभागातील मागील वर्षी प्रमाणे महावितरण विभागात निघालेल्या विविध निविदा प्रक्रियांमध्ये बनावट अनुभव प्रमाणपत्र/दस्तावेज सादर करून संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याशी आर्थिक हितसंबंध साधून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजकीय/आर्थिक दबावात घेऊन पात्रता नसताना निविदा प्रक्रियेत पात्र होण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहता महावितरणच्या विविध विभागातील कार्यकारी अभियंता यांनी संबंधित ठेकेदारांनी सादर केलेल्या सर्व अनुभव प्रमाणपत्र दस्तावेजांची सखोल चौकशी करुन पात्र अपात्रतेचा योग्य निर्णय घ्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर या संबंधित भ्रष्ट कार्यकारी अभियंत्यांच्या निषेधार्थ तीव्रजनाक्रोश आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी निवेदनाद्वारे अधीक्षक अभियंता यांना दिलेला आहे.