पुण्या मधील कोथरूड परिसरातील एका इमारतीमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे.
76 वर्षांची वृद्ध महिला या घरामध्ये भाड्याने राहत होती. या वृद्ध महिलेचा मृतदेह घरामध्ये जळलेल्या अवस्थेमध्ये आढळला आहे.
कोथरूड परिसरातील गुरू गणेश नगर भागातल्या इमारतीमध्ये वन रूम किचनच्या घरात ही वृद्ध महिला एकटीच राहत होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळी 8.30 वाजता आम्हाला या महिलेबाबत सूचना मिळाली, त्यानंतर पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
घरामध्ये दिवा लावताना महिला आगीच्या संपर्कात आली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतरच महिलेच्या मृत्यूबाबत आणखी माहिती मिळेल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.