नाशिक शहरात एका रिक्षाचालकाने भररस्त्यात नग्न होऊन अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तातडीने कारवाई केली.
या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयित आरोपी रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख याला अटक केली आहे. संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आलेय. यापूर्वी त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना नाशिकमधील मुंबई नाका परिसरात घडली. पीडित महिला बसमधून उतरल्यानंतर आरोपी रिक्षाचालकाने वाट अडवली. त्याने नग्न होऊन अश्लील हावभाव करत विनयभंग केला. यावेळी महिलेला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बसचालक आणि वाहकाला आरोपीने मारहाण केली. एवढेच नव्हे, तर त्याने बस दगडफेक करून वाहनाचे नुकसानही केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
संशयित आरोपी मिजान रजा हा अट्टल गुन्हेगार आहे. नाशिकमध्ये घडलेल्या दंगली आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिजान याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या.
मुंबई नाका पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. त्याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे