पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातून एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. धायरी येथील श्री ज्वेलर्स या सराफा दुकाना मध्ये सोने घेण्याच्या बहाण्याने दुकानात तीन दरोडेखोरांनी प्रवेश केला आणि पिस्तूल चा धाक दाखवत भरदिवसा दरोडा टाकला ,तब्बल २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे.
विशेष म्हणजे या लुटीसाठी आरोपींनी खऱ्या पिस्तुलाऐवजी प्लास्टिकच्या बनावटीच्या पिस्तुलाचा वापर केल्याचं तपासात उघड झालं आहे.
सोन्याच्या दुकानाचे मालक विष्णू दहीवाळ यांनी या घटनेबाबत तातडीने नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला आणि काही वेळातच प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून लुटीचा थरार उडवून दिला.
दरोड्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, आरोपी पसार होतानाचे स्पष्ट चित्रण त्यात दिसून येत आहे.
पोलीस प्रशासन लवकरच आरोपींचा शोध घेतील व त्यांना लवकरच बेड्या ठोकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, भरदिवसा अशा प्रकारे झालेल्या लुटीमुळे सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.