आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु
रावेर(प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने रावेर तालुक्यात नविन राजकीय समीकरणांची पायाभरणी करत, तालुक्यासाठी एक नवकल्पना राबवली आहे. आज रावेर येथे झालेल्या जाहीर बैठकीत भाजपाने प्रथमच तीन तालुकाध्यक्षांची नियुक्ती करत राजकीय वर्तुळात चर्चेला नवा रंग दिला आहे.
पक्षाच्या निर्णयानुसार रावेर पूर्व तालुकाध्यक्षपदी रविंद्र पाटील, रावेर पश्चिम तालुकाध्यक्षपदी ॲड. सूर्यकांत देशमुख तर सावदा मंडळाचे तालुकाध्यक्षपदी दुर्गादास पाटील यांची निवड करण्यात आली. या तिघांच्या नावांची घोषणा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली असून त्यांच्या निवडीनंतर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, तसेच आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली घेण्यात आले होते. यावेळी प्रदेश सदस्य सुरेश धनके, निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, केतकीताई पाटील, रंजनाताई प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, सुनील पाटील, श्रीकांत महाजन, हरिलाल कोळी, महेश चौधरी आणि महेश पाटील संदीप सावळे राजन लासूरकर नितीन पाटील अरुण शिंदे आदींची उपस्थिती होती.
भाजपाने तिघांची निवड करताना सामाजिक समावेश आणि विविध भागातील प्रतिनिधित्व या मुद्द्याला प्राधान्य दिले आहे. सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत आगामी निवडणुकांसाठी मजबूत संघटना तयार करण्याचा पक्षाचा उद्देश स्पष्ट दिसतो.या नव्या नेमणुकीमुळे रावेर तालुक्यात भाजपाच्या संघटनात्मक मजबुतीला नवी दिशा मिळणार असून, तालुका पातळीवर भाजपाची तयारी अधिक भक्कम होत असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.