कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची धुरा आता रोहिणी सचिन घुले यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली असून, याबाबत अधिकृत घोषणा आज करण्यात आली.
नगराध्यक्षपदासाठी आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यावेळी प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे रोहिणी घुले यांची निवड बिनविरोध झाली.
प्रमुख भाजप नेते प्रविण घुले यांच्या नेतृत्वाखाली घुले गटाने नगरपंचायतीमध्ये बहुमत मिळवले. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी घुले यांच्याकडून रोहिणी घुले यांचे नाव पुढे करण्यात आले.
पूर्वी उपनगराध्यक्ष पदावर कामाचा अनुभव असलेल्या रोहिणी घुले या शांत, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्या कामसू व्यक्तिमत्वाच्या असून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या नगराध्यक्षांकडून शहरातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.