दौंड शहरातील खाटीक गल्ली परिसरात मंगळवार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने छापा टाकून गोवंश कत्तलीप्रकरणी कारवाई केली.
या कारवाईत १,२०० किलो गोमांससह एकूण २ लाख १७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींना घटनास्थळी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाटीक गल्ली परिसरात काहीजण गोवंशाची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच तत्काळ दौंड पोलीस उपनिरीक्षक संतोष कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बनकर, देवकाटे, पोलीस शिपाई महादेव जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
छाप्यादरम्यान आसिफ कासम कुरेशी, शाहरुख शरीफ कुरेशी, अकील बाबू कुरेशी, वाहिद बाबू खान हे आरोपी गोमांस कापताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
मात्र आलम मुस्कान शेख, नितीन उचाप्पा गायकवाड व अझीम कुरेशी हे आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पोलिसांनी पंचनामा करून १,२०० किलो गोमांस, धारदार शस्त्रे, वजनकाटे व इतर साहित्य असा एकूण २,१७,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी दौंड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३ (५) व प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत कलम ५ (c), ९ (a), ९ (b) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मानद प्राणी कल्याण अधिकारी अहिरेश्वर जगन्नाथ जगताप (रा. वरवंड, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार निखिल जाधव करत आहेत.