शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी (उचाळेवस्ती) येथे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राहुल गायकवाड यांनी त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, सात जणांच्या एका गटाने संगनमताने त्यांच्या हिंदू कुटुंबावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींनी “बायबल वाचा, ख्रिश्चन धर्म स्वीकारा, आर्थिक मदत करू” असे आमिष दाखवत धर्मांतरासाठी मानसिक दबाव टाकला. इतकेच नव्हे, तर घरातील हिंदू देव-देवतांचा अवमान करत अपशब्द वापरण्यात आले व धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला गेला. “तुमच्या देवांनी काय केलं?”, “तुमच्या देवांमुळे काही फायदा झाला का?” असे विचारत घरातील काळुबाई आणि स्वामी नरेंद्र महाराज यांच्या फोटोंकडे हातवारे करत अपमान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, हिंदू आणि ख्रिश्चन समाजात तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू या प्रकारामागे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रशांत जालिंधर घोडे, मोजस बार्बनबस डेव्हिड, अमोल विठ्ठलराव गायकवाड, योगेश संभुवेल रक्षत, जेसी ऍलिस्टर अँथोनी, कुणाल जितेश भावणे, व सिद्धांत सदार कांबळे या सात जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.