भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण वातावरण असताना, सोशल मीडियावर “पाकिस्तान जिंदाबाद” अशी पोस्ट ठेवणं पुण्यातील एका विद्यार्थिनीला चांगलंच महागात पडलं आहे.
सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी आणि कोंढवा परिसरात राहणारी खादिजा शेख हिने आपल्या स्टेटसद्वारे पाकिस्तानचं समर्थन करत भारताविरोधात गरळ ओकली.
या प्रकारानंतर सकल हिंदू समाज या एक्स हॅण्डलवरून खादिजा शेखच्या स्टेटसचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले. यानंतर भाजप कार्यकर्त्या सुनैना होले यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर खादिजा शेख विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 152, 196, 197, 299, 302 आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुणे पोलिसांनी तिला अटक केली आहे.
खादिजा शेखने आपल्या स्टेटसद्वारे, “भारताने कोणतेही पुरावे न देता पाकिस्तानवर हल्ला केला” असेही विधान केले. विशेष म्हणजे, हे विधान जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे असे सांगण्यात येत आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.