बारामती तालुक्यातील सुपे गावात उरुसानिमित्त आयोजित कव्वाली कार्यक्रमानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे.
कव्वाली पाहून घरी परतणाऱ्या दोन युवकांना चार जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. याप्रकरणी सुपे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिनांक १८ मे रोजी रात्री १२:३० च्या सुमारास अविनाश शाहू आवळे आणि त्यांचा मेहुणा अक्षय तानाजी देवकुळे (दोघेही रा. सुपे, ता. बारामती, जि. पुणे) हे उरुसानिमित्त झालेल्या कव्वाली कार्यक्रमानंतर सुपे बाजार पेठेतील मार्गाने घरी परतत होते. यावेळी स्कूटी मोटारसायकलला साईड न दिल्याच्या कारणावरून प्रतिक जगताप, आदित्य जगताप, सम्यक धेंडे आणि त्यांच्या एका अनोळखी मित्राने अविनाश आवळे यांना अडवून शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी त्यांचा मेहुणा अक्षय देवकुळे यास देखील या चौघांनी बेदम मारहाण केली. आरोपींनी फरशी व विटांचा वापर करून अक्षय यांच्या डोक्यावर, खांद्यावर आणि पाठीवर गंभीर स्वरूपाचे घाव केले. मारहाणीनंतर आरोपींनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुपे पोलीस ठाण्यात प्रतिक जगताप, आदित्य जगताप, सम्यक धेंडे आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुपे पोलीस करीत आहेत.