दौंड शहरातील गाव वेशीजवळील हनुमान मंदिर परिसरात मागील महिनाभरापासून ड्रेनेज चेंबर चोकअप झाल्याने सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याच ठिकाणी मंडई भरत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच अमरधाम स्मशानभूमीकडे व भिमा नदीच्या दिशेने जाणारा मुख्य रस्ताही या घाण पाण्याने पूर्णपणे झाकला गेला आहे.
मंडईसाठी येणारे नागरिक, हनुमान मंदिरातील भक्तगण, अंत्यविधीसाठी जाणारे लोक तसेच दशक्रिया विधीसाठी भिमा नदीकडे येणारे नागरिक यांना याच सांडपाण्यातून चालावे लागत आहे, ही अत्यंत दूःखद व अस्वस्थ करणारी बाब आहे.
स्थानिक नागरिक व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंबंधी अनेकदा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, सध्या दौंड नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने कोणीही या समस्येकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आज दौंड नगरपालिकेचे अभियंता श्री. तडवी यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी नेऊन नागरिकांनी परिस्थितीची जाणीव करून दिली. आरोग्य विभाग व बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत, उद्या कारवाई केली जाईल असे आश्वासन तडवी साहेबांनी दिले आहे. नागरिक आता या आश्वासनाची अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्ष ठेवून आहेत.