पुणे, २४ मे: पुणे शहर पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरुद्ध मोठी मोहीम राबवत खराडी परिसरातील एका बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड केला आहे. प्राईड आयकॉन इमारतीत कार्यरत असलेल्या या कॉल सेंटरवर मध्यरात्री छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. या धडक कारवाईत आतापर्यंत १०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ४१ मोबाईल फोन्स, ६१ लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचे सायबर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
सायबर गुन्हे शाखेची मध्यरात्री कारवाई
खराडी-मुंढवा बायपासवरील प्राईड आयकॉन इमारतीच्या नवव्या मजल्यावर ‘मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी’ नावाचे बोगस कॉल सेंटर कार्यरत होते. याठिकाणी काम करणारे १०० ते १५० कर्मचारी प्रामुख्याने गुजरात राज्यातील असून, यात अनेक तरुण-तरुणींचा समावेश आहे.
या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना फोन करून, त्यांना ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली धमकावून आर्थिक फसवणूक केली जात होती. अमेरिकन नागरिकांकडून लाखो रुपयांची वसुली करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
२०० पोलिसांचा फौजफाटा, पाच जण अटकेत
या कारवाईसाठी पुणे पोलिसांनी २०० पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. पोलिसांनी पाच प्रमुख संशयितांना अटक केली असून, उर्वरितांशी चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी पुणे पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.
मुख्य सूत्रधार गुजरातमधील, तपास अन्य राज्यांत वळवला
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार गुजरातमधील असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी आता तपासाची व्याप्ती गुजरातसह इतर राज्यांत वाढवली आहे. जप्त करण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांचा सखोल तपास सुरू असून, गुन्हेगारी जाळ्याची सखोल माहिती पुढील काळात उजेडात येण्याची शक्यता आहे.
पुढील तपास सुरू
पुणे सायबर पोलिसांची ही कारवाई सायबर गुन्हेगारीविरुद्ध एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात असून, या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींना पकडण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.