कोरोना विषाणूने पुन्हा एकदा मुंबईत आपली झळक दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होत असताना आता मृत्यूंचीही नोंद होऊ लागली आहे. मुंबईत कोरोना संसर्गामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये एका ७० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे, तिला हृदयविकाराचा त्रास होता. तिचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला असून, मृत्यूनंतरच्या चाचणीत तिला कोरोना असल्याचं निष्पन्न झालं. विशेष म्हणजे तिच्या मृत्यूबाबत मुंबई महापालिकेला माहिती दोन दिवसांपूर्वीच मिळाली.
याशिवाय, रविवारी एका दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये एका १४ वर्षीय मुलीचा समावेश आहे तिला किडनीचा आजार होता, तर दुसरी ५९ वर्षीय महिला कॅन्सरग्रस्त होती आणि तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते.
राज्यात जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत एकूण ६८१९ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी २१० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे फक्त २३ मे रोजी ४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून यापैकी ३५ रुग्ण मुंबईतील आहेत. यामुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या आता १८५ वर पोहोचली आहे.
मे महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक १७७ प्रकरणे नोंदली गेल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने सतर्कता बाळगायला सुरुवात केली आहे. विविध रुग्णालयांमध्ये राखीव खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, गरज भासल्यास अतिरिक्त आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील, असे बीएमसीकडून सांगण्यात आले आहे.
सर्व रुग्णांमध्ये फ्ल्यू आणि सहव्याधी असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.