नागरिकांच्या अडचणी, तक्रारी आणि विविध वादांचे जलद निवारण व्हावे या उद्देशाने आज दौंड पोलीस स्टेशनमध्ये “तक्रार निवारण दिन” साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एकूण १८ तक्रारदार आणि गैरअर्जदारांना समोरासमोर बोलावून त्यांच्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली आणि अनेक प्रकरणांवर तातडीने तोडगा काढण्यात आला.
या उपक्रमात पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि संबंधित पोलीस अधिकारी यांनी तक्रारदारांची तक्रारी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतल्या. पोलिसांच्या मध्यस्थीने काही तक्रारींवर जागेवरच योग्य तो तोडगा काढण्यात आला, तर काही प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी नोंदवून घेतली गेली.
प्रत्येक शनिवारी उपक्रम राबवला जाणार
दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांसाठी ही एक महत्वाची सुविधा असून, नागरिकांनी आपल्या तक्रारी वेळेत आणि योग्य पद्धतीने मांडाव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. पुढे बोलताना पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, “प्रत्येक शनिवारी दौंड पोलीस स्टेशनमध्ये ‘तक्रार निवारण दिन’ साजरा केला जाणार आहे. या दिवशी तक्रारदार आणि संबंधित व्यक्तींनी उपस्थित राहून आपल्या तक्रारींबाबत माहिती द्यावी, जेणेकरून प्रशासनाकडून तत्काळ मदत व तोडगा उपलब्ध करून देता येईल.”
नागरिकांनी पुढे यावे – पोलीस प्रशासनाचा आग्रह
हा उपक्रम लोकसहभाग वाढवण्यासाठी, नागरिकांशी संवाद प्रस्थापित करण्यासाठी आणि तक्रारी वेळेत सोडवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे दौंड परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व पोलिसांच्या सहकार्याने आपल्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे आवाहन दौंड पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आले आहे.