पुण्यामधील देहू मध्ये एका प्रेमविवाहातून एकत्र आलेलं नातं एका भीषण हत्येच्या घटनेत संपलं आहे. श्री क्षेत्र देहू येथील वडाचा मळा परिसरात वैभव लांबकाणे या 28 वर्षीय तरुणाने आपल्या पत्नी पूजा पाटील हिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव आणि पूजा यांनी तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, वैभवच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. विवाहानंतर काही दिवसातच वैभव पूजावर मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. किरकोळ कारणावरून नेहमीच दोघांमध्ये वाद होत असत.
गुरुवारी सायंकाळी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. मध्यरात्री, झोपेत असलेल्या पूजाचा वैभवने गळा दाबून खून केला. पूजाने जीव वाचवण्यासाठी झुंज दिली, मात्र वैभवने गळा न सोडता तिचा मृत्यू घडवून आणला.
पश्चात्तापाच्या ढोंगाखाली वैभव रात्रीभर पूजाच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. सकाळी नातेवाईकांना त्याने माहिती दिली की पूजाला छातीत दुखत होतं आणि ती झोपेतच मरण पावली. मात्र, मृतदेह पाहून नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी देहूरोड पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता मृत्यू संशयास्पद वाटल्यामुळे वैभवला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवताच वैभवने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली.
ही घटना मावळ तालुक्यात आठवड्याभरातील दुसरी हत्या आहे. काही दिवसांपूर्वी तळेगावमध्ये 22 वर्षीय सुनेने कौटुंबिक वादातून आपल्या सासूचा गळा कापडी ब्लाउजने आवळून खून केल्याची घटना समोर आली होती.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादाच्या हिंसक रूपांतरांविषयी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस तपास पुढे सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.