सोलापूर जिल्ह्यामधील सौदले गावामध्ये एक प्रकार उघडकीस आला आहे.
आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात धरून एका तरुणाने आपल्या मित्राचा निर्घृण खून केला आणि मृतदेह शेतात पुरून टाकल्याची धक्कादायक घटना सौंदणे गावात उघडकीस आली आहे.
विकास मारुती गुरव (रा. सौंदणे) या तरुणाने नेताजी तानाजी नामदे (वय २४) याचा खून केल्याची कबुली दिली असून, मोहोळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ही घटना २४ ते २८ मे २०२५ दरम्यान घडली. नेताजी दळण आणण्यासाठी घराबाहेर पडला होता, मात्र तो परत न आल्याने त्याचे वडील तानाजी नामदे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी मोबाईल डेटा आणि व्हॉट्सअॅप चॅट्सच्या आधारे तपासाची दिशा ठरवली.
वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार पोलिसांनी विकास गुरव याला ताब्यात घेतले असता, चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याच्या म्हणण्यानुसार, नेताजी आणि आपल्या आईमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या मनात होता. या संशयातूनच त्याने नेताजीचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह गावाशेजारील शेतात पुरला.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शेतातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणात विकास गुरव याला २ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील आणखी काही तपशील उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या हत्येने सौंदणे गावासह संपूर्ण मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण झाले असून, अनेकांनी या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.