दौंड मध्ये येत्या ७ जून रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि बकरी ईद ती हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार असल्याने शहरातील सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हिंदू आणि मुस्लिम समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक गोपाळ पवार म्हणाले, “सण व जयंती आनंदात साजरे करा, पण कोणाच्याही भावना दुखावणारे वर्तन टाळा.”
त्यांनी पुढे सांगितले की, “व्हाट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या श्रद्धा दुखावतील असे मजकूर, फोटो वा व्हिडिओ पोस्ट करू नयेत. काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्ती समाजात असतात, पण त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे.”
बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी देताना गोवंश हत्या होणार नाही याची दक्षता घ्यावी, कायद्याचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल होतात आणि त्यामुळे संपूर्ण समाजाला अडचणींना सामोरे जावे लागते. अशा गुन्ह्यांमुळे सरकारी नोकरी, पासपोर्ट, धार्मिक यात्रा यासारख्या गोष्टींमध्ये अडथळे निर्माण होतात, हे गांभीर्याने समजून घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
“दौंड शहराची भाईचारा व सलोख्याची परंपरा कायम राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,” असे सांगून पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी नागरिकांना पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दौंड शहरात बकरी ईद आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती एकाच दिवशी; पोलीस निरीक्षकांचा शांतता आणि सलोखा राखण्याचा संदेश
17