दौंड शहरातील खाटीक गल्ली परिसरात गोहत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दौंड पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ४ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास छापा टाकून गायीची कत्तल करताना तिघांना रंगेहाथ पकडले. घटनास्थळी २५० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजित किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे.
पोलिसांनी अलीम शेख, नितीन गायकवाड आणि आसिफ कासम कुरेशी (सर्व रा. खाटीक गल्ली, दौंड) या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३२५, ३(५) आणि प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ५(क), ९(अ), ९(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल करमचंद बाळासो बंडगर यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, खाटीक गल्लीतील पत्र्याच्या शेडमध्ये गायीची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अलीम शेख व नितीन गायकवाड यांना घटनास्थळी अटक केली. चौकशी दरम्यान त्यांनी ही कत्तल आसिफ कुरेशीच्या सांगण्यावरून केल्याचे कबूल केले.
दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी संभाजी महाराज जयंती आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीद्वारे कायदा व सुव्यवस्थेचा संदेश दिला होता. मात्र, अशा घटनांमुळे शहरातील जातीय सलोखा तडा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असून, अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
खाटीक गल्ली परिसरात अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जबाबदार यंत्रणांनी ठोस कारवाई न केल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.