पुणे मधील चाकण परिसरातून एका ३० वर्षीय महिलेच्या अपहरण आणि बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ५ ते ७ जूनदरम्यान ही घटना घडली असून, महिलेच्या तक्रारीनुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी प्रमुख आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पीडित महिलेने यापूर्वी मुख्य आरोपी गणेश नानेकरविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने रागातून नानेकरने हे कृत्य केल्याचा संशय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानेकर याने पीडितेचे चाकूच्या धाकाने अपहरण करून तिला साथीदारांच्या मदतीने बारकू गोसावी यांच्या घरी नेले. तेथे तिला खोलीत डांबून चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळी तिच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गणेश नानेकर, बारकू गोसावी, सुभाष सुतार, प्रज्वल जाधव आणि यश शिंदे यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींना १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर ओम नानेकर आणि रणजित येरकर हे अद्याप फरार असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मुख्य आरोपी गणेश नानेकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात राज्यभरात १४ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वीही पीडित महिलेने त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती. मात्र, पुराव्याअभावी ती केस पुढे गेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.