अहिल्यानगर तालुक्यातील एका 20 वर्षीय तरुणीच्या अपहरण आणि बलात्कार प्रकरणाने खळबळ उडवली आहे. पीडित तरुणीला दिनांक 2 जून रोजी आळंदी येथील केळगाव रोडवरील एका खासगी महिला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घरी एकटी असताना एक महिला कीर्तनकार तिला भेटण्यास आली. “शेतात फिरून येऊया,” असं सांगून तिला घराबाहेर नेण्यात आलं. त्यानंतर तिला जबरदस्तीने काळ्या चारचाकी वाहनात (MH 43 CC 7812) बसवून पुण्याच्या दिशेने नेण्यात आलं. आवाज केला तर चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिल्यामुळे तरुणीने भयगंडामुळे प्रतिकार केला नाही.
पुढे आळंदी परिसरात एका खासगी इमारतीत तिला बंदिस्त ठेवून वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आला. आरोपी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे याने पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार केला, तर इतर आरोपींनी – प्रवीण आंधळे, अभिमन्यू आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे व एक अनोळखी वाहनचालक – तिला धमकावत लग्नासाठी दबाव टाकला.
तथापि, पीडित तरुणीने धैर्य दाखवत संधी मिळताच 112 आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी पोहोचून पीडितेची सुटका केली व आरोपींना ताब्यात घेतलं.
या प्रकरणी पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात संबंधित पाच आरोपींविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपास सुरु असून प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
