लोणावळ्यातील ठाकूरसाई गावात एका ३३ वर्षीय महिलेवर निर्जनस्थळी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पवनानगर भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी केवळ आठ तासांत आरोपीला अटक केली आहे.
माहितीनुसार, पीडित महिला आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली असताना, बाळू शिर्के या आरोपीने दुचाकीवरून तिचा पाठलाग करत निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार केला. कृत्य केल्यानंतर आरोपीने पीडितेला तसाच टाकून पळ काढला.
पीडितेने धाडस दाखवत लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. घटनास्थळाजवळ कोणताही थेट पुरावा नसतानाही पोलिसांनी एका लांब अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा माग काढला.
फुटेजमध्ये आरोपी पीडितेचा पाठलाग करताना दिसून आला होता आणि त्याने परिधान केलेल्या जॅकेटमुळे संशय बळावला. पोलिसांनी मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये शोधमोहीम राबवत अखेर बाळू शिर्के याला अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लोणावळा पोलिसांचा या प्रकरणातील जलद आणि ठोस तपास कौतुकास्पद असून पुढील चौकशी वेगात सुरू आहे.
