मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या महाराष्ट्रात पुणे जिल्हा मधील यवत मध्ये एकदा दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात शुक्रवारी दुपारी अचानक तणाव निर्माण झाला. एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. या वादाने क्षणार्धात हिंसक वळण घेतलं आणि संपूर्ण गावात दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीचे सत्र सुरू झाले.
सुरुवातीला व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची माहिती समोर आली. ही पोस्ट धार्मिक भावना दुखावणारी होती. त्यामुळे गावातील दोन गट एकमेकांवर तुटून पडले. दगडफेक झाली, घरांवर हल्ले झाले आणि वाहनांना आगी लावण्यात आल्या. काही युवकांनी मशिदीवर हल्ला केल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
संतप्त जमावाने एका बेकरीच्या गाडीला पेटवून दिले, तर यवतच्या विविध भागांत गाड्या, कार्यालयं, दुकानं फोडण्यात आली. यामुळे गावात काही वेळातच भीतीचं आणि धक्कादायक वातावरण निर्माण झालं.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त दंगल पथक बोलावण्यात आलं. जमावाला पांगवण्यासाठी हवेत अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असली, तरी अजूनही काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता कायम आहे.
या प्रकाराला एक महत्त्वाची घडलेली पार्श्वभूमी आहे. गुरुवारीच यवत येथे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जनआक्रोश सभा पार पडली होती. यामध्ये काही दिवसांपूर्वी नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आधीच गावातील वातावरण तापलेलं असताना, व्हॉट्सअॅपवरील पोस्टने ते अधिक चिघळवले.
सध्याची परिस्थिती अशी आहे की जागोजागी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
तसेच सोशल मीडियावर नियंत्रणासाठी पोलीस सतर्क.
प्रशासनाने अफवांपासून दूर राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.
कोणीही कोणतीही सोशल मीडियावर अफवा पसरवू नका. सत्य माहितीचीच देवाणघेवाण करा. प्रशासन व पोलिसांशी सहकार्य करा.